मुलीची आई असणं किती भाग्याचं!!


आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..
इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..
आई भाजलं ना तुला..
फुंकर घालत क्रीम लावली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..
तू पिल्लुला घेतलंय ना..
ओझं होईल तुला..
छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

पिल्लू रडू नको ना..
आई येते आत्ता… अले अले..
गप बश..गप बश..
माझ्या माघारी ती आई झाली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

चप्पल नाही घातलीस आई तू?
राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..
वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..
तिला मायक्रोव्हेव हवा आहे..
बुक करून ठेव हां..
आणि साडी आन.. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’
आईची आवड तिला कळाली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..
शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिला लक्षात आली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..
लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत
आईची गरज तिने ओळखली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

दादा, तू फराळाचं समान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..
तेवढ्याच ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली.
आईची माया तिला उमजली..
कधी मोठी झाली कळलंच नाही..

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,
ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,
शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,
कधी मोठी झाली कळलंच नाही..

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून ‘ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजुन काय काय अन् काय काय..
लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी..
मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..
लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,
आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..
मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…
हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,
परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही……

सर्व आईना व लेकीना समर्पित

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from CREATIVE-INSIGHTS

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Exit mobile version